गुढीपाडवा का साजरा करतात ? Why Celebrate Gudhi Padava?

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिके प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे.

वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.

गुढीचे स्वरूप आणि उत्सवाचे महत्व.   

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.

गुढीपाडवा अन्य धार्मिक उपचार-

    स्नान इ. दैनंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात.या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-

"तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||"

    अर्थ - तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते.

    चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत; तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे तो असा- अभ्यंगस्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या. 

एकाच वर्षात दोन गुढीपाडवे.

    साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षात वर्षारंभी एक आणि एकच गुढीपाडवा येतो. पण शके १९३८मध्ये दोन गुढीपाडवे आले होते.

    ८ एप्रिल २०१६पासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९३८ या नूतनवर्षी वर्षारंभी आणि वर्षअखेरीस असे दोन गुढीपाडवे आले होते. ८ एप्रिल २०१६ रोजी रोजी गुढीपाडवा आलाच होता, पण नंतरच्या वर्षी शके १९३९ च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी असल्याने त्या दिवशी, म्हणजे २९ मार्च २०१७ रोजी गुढीपाडवा नव्हता. तो आदल्या दिवशीच्या २८ मार्च २०१७ रोजी आलेल्या अमावास्येच्या दिवशी-सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर साजरा करावा लागला.

गुढीपाडवाचा महाभारतातील उल्लेख.

    महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.

गुढीपाडवाचा सांस्कृृतिक इतिहास.

  • ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. 
  • श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
  • शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.
  • प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हणले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. 

महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ.

    इ. स. १२७८ च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात; पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात.

    आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्‍हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यास ते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन (कम्युनिकेशन टूल) असावे. या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे. तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात "पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥"

    १६ व्या शतकातील विष्णूदास नामा यांच्या अभंगात गुढीपाढव्याच्या दिवसाचा उल्लेख 'गुढीयेसी' असा होताना रामाच्या अयोध्येस परत येण्याच्या प्रसंगाशी या अभंगात संगती लावली गेल्याचे दिसते, तो अभंग असा"

आनंदु वो माये नगरी उत्सवो । आजि येईल रामरावो ।।
मोतिया तांदुळ कांडिती बाळा । गाती वेळोवेळा रामचंद्र ।।
अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन । धन्य आजि दिन सोनियाचा ।।
कनक दंड चवऱ्या ढळताती रामा । विष्णूदास नामा गुढीयेसी ||

गुढी पाडव्याचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व.

    चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते.) शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

अस्वीकरण: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास, नेहमी आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

जाणून घ्या आपल्या आरोग्या विषयी अधिक माहिती.
'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे.

=> आरोग्यम् धनसंपदा.

    माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना शेयर नक्की करा. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी माझी मराठी भाषाला फॉलो करा..!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!