४ आषाढ दिन विशेष

आषाढ हा हिंदू पंचांगा प्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिके प्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. 

        सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू असतो. भारतीय सरकारी पंचांगा प्रमाणे २२ जून ते २२ जुलै या काळात आषाढ महिना असतो. 

        आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे. या महिन्याला 'शुचि' असेही म्हणले जाते.

           आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी, ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला 'देवशयनी आषाढी एकादशी' असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

        हिंदू पंचांगप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात, त्यामुळे दोन तिथ्या असतात, एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी. म्हणून आषाढ महिन्यात एकादशी दोनदा येते, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.

        प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११व्या तिथीला एकादशी म्हणले जाते. चांद्रमास गणनेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास स्मार्त आणि भागवत एकादशी, असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद येतात. त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी ‘स्मार्त’ व दुसऱ्या दिवशी ‘भागवत’, असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात ‘स्मार्त’ आणि ‘भागवत’, अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते. परंतु, भागवत एकादशीला नाव नसते.

        अधिक मास आल्यास अधिक महिन्याच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. अशावेळी निज महिन्यातील तिथी ग्राह्य धरली जाते.

धार्मिक मान्यता

        देवशयनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात (एक वैश्विक महासागर) शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरि शयनी एकादशी असे म्हणले जाते. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात. हा काळ चतुर्मास (चार महिने) म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो. शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात असते. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात.

महत्व

        भविष्योत्तर पुराणात, कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे, कारण निर्माता-देव ब्रह्मदेवाने त्यांच्या पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते. राजा मंडताची कथा याच संदर्भात सांगितली आहे. धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्षे दुष्काळ पडला होता, परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही. अखेरीस, अंगिरस ऋषींनी राजाला देव-शयनी एकादशीचे व्रत (व्रत) पाळण्याचा सल्ला दिला. असे केल्यावर विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला.

पंढरपूर वारी

        महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगर येथून मुक्ताबाई यांची, उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते.

उपासना आणि उपवास

        आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात. स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!