श्री केशव विष्णू बेलसरे यांचे जीवन चरित्र.

बाबांच्या लहानपणी, श्री.भटजीबापू यांनी केलेले भाकीत खरे ठरले, बाबांनी पारमार्थिक उंची गाठली आणि ते महाराजांचे सद्शिष्य झाले.

श्री केशव विष्णू बेलसरे: बाबांच्या घरातील परिस्थिती, सामाजिक उलाढाली, निजामशाहीचे वातावरण आणि सर्वांत मुख्य म्हणजे देशभरात पेटलेले स्वातंत्र्यचळवळीचे लोण यांमुळे त्यांच्या मनावर खोल परिणाम झाले. क्रांतिकारक कारवायांमध्ये तेही सहभागी झाले. जेव्हा तब्येत बिघडली आणि मेंदू शिणला, मन अस्थिर होऊन नकारात्मक विचारांचा त्रास होऊ लागला, तेव्हा दासबोधातील “जेही उदंड कष्ट केले। तेची भाग्य भोगून गेले।” या ओवीने त्यांचे मनपरिवर्तन झाले. भरपूर अभ्यास करून ज्ञानार्जन करावे, असे त्यांनी ठरविले. त्यांचे वडील, आजोबा आणि आत्या नित्य जप व ध्यान करीत असत. ते पाहून आणि मनःशांतीसाठी त्यांनी अनेकदा ‘श्रीराम’ किंवा ‘ओम्’चा जप करीत.

    एकदा मारुतीसमोर जप करताना “तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा” असे स्पष्ट शब्द त्यांस ऐकू आले. त्या अंतःप्रेरणेच्या जोरावर त्यांनी विज्ञान विषय सोडून तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास करायचा निर्णय घेतला. घरातील ज्येष्ठ मंडळींचा विरोध पत्करून ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात तत्त्वज्ञान शिकण्यास आले. हा विषय त्यांना खरोखर आवडला आणि त्याचा सखोल अभ्यास त्यांनी आरंभला. ते कोणताही विषय नीट वाचून तो समजून घेत आणि लिहून काढीत. तो पूर्णपणे आत्मसात करून त्यावर चिंतन व पुनर्विचार करीत. त्यांचा विचार मुळातच शुद्ध आणि तर्काला धरून होता. त्यांना विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारी गोष्ट स्वाभाविकच पटत असे. तत्त्वज्ञानाचा अभ्यास करीत असताना पडणार्‍या विविध प्रश्नांची कायमस्वरूपी उत्तरे मिळविण्यासाठी त्यांनी तत्त्वज्ञानाबरोबरच तर्कशास्त्र, मानसशास्त्र, शरीरशास्त्र, समाजशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल, काव्य, नाट्य, विनोद व अशा अनेक विषयांचा अभ्यास केला. भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून दोघांमधील साधर्म्य आणि विसंगती हे दोन्ही त्यांनी समजून घेतले. त्यांच्या ज्ञानाचा हा व्यासंग त्यांच्या प्रवचनांत अनुभवास येत असे.

        जगामधे सर्व विषय, शास्त्रे, वाङ्मय किंवा ज्ञान हे एकसत्य रूपाने एकमेकांशी जोडलेले किंबहुना एकच असतात. परंतु मानवी बुद्धीच्या सामर्थ्याने त्यांची सांगड घालून सामान्यांना समजावून देण्याचे महाकठीण काम त्यांनी लीलया पेलले. तत्पूर्वी १० वर्षे दादरच्या बालमोहन विद्यालयामधे इंग्रजी भाषा शिकविल्यावर मग सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक (प्रोफेसर) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेथे तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र हे विषय ते शिकवीत असत.

        बेलसरे यांची भेट श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी झाली. पहिल्याच भेटीत श्रीमहाराजांनी त्यांना (बाबांना) आपलेसे करून घेतले व “नेहमी येत जावे” असे सांगितले. श्रीमहाराजांमुळे क्रांती घडून आली आणि श्रीमहाराजांच्या मार्गदर्शनाखाली खरी साधना सुरू झाली. त्यांच्याच कृपेने तत्त्वज्ञानाचा, जीवनाचा आणि परमार्थाचा खरा अर्थ कळला. नामसाधना आणि सद्गुरूंचे आज्ञापालन हे जीवनाचे ध्येय ठरले. श्रीमहाराजांनी दिलेले पवित्र नाम आणि त्यांची आज्ञा हे व्रतत्यांनी पुढे जन्मभर सांभाळले. महाराज म्हणत, “तत्त्वज्ञान जीवनातून निर्माण व्हावे, पुस्तकातून नाही”. त्यामुळे प्रत्यक्ष जीवनातून उगम पावलेले आणि श्रींच्या सांगण्याला धरून असलेले तत्त्वज्ञान तेवढेच खरे ही बाबांची खात्री होती. ‘अथातो ब्रम्हजिज्ञासा’ ऐवजी ‘अथातो जीवनजिज्ञासा’ हे जास्त योग्य आहे, असे ते सांगत.

        बाबांचे जीवन अत्यंत साधे परंतु शिस्तबद्ध होते. आपले शरीर आणि मन ते अतिशय स्वच्छ व पवित्र ठेवीत असत. त्यांचे कपडे साधे, स्वच्छ, पांढरे व सुती असत. त्यांचे खाणे सुद्धा मर्यादित आणि सात्विक असे. ते स्वतःशी अतिशय कठोर वागत. त्यांनी आपली साधना व अभ्यास यांबाबतीत कसलीही तडजोड केली नाही व त्यासाठी कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. परंतु हे करतांना मात्र आपली व्यवहारातील व प्रापंचिक कर्तव्ये ते न चुकता करीत असत.

        साधनात आपले सर्वस्व ओतल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही, असे ते नेहमी सांगत, “Put your soul into it” हे त्यांचे शब्द होते. बाबांनी आपल्या साधनेचा नव्हे, जीवनाचाच वृतांत कोणताही आडपडदा न ठेवता आनंदसाधना या आत्मचरित्रात सांगितला आहे. साधनेतील अडचणी, विविध टप्पे, अनुभव आणि एकूण साधनप्रवास यांचे ज्ञान बाबांनी सामान्य साधकांसाठी खुले केले. विचार, विवेक आणि गुरूभक्ती या तीन पायांवर पेलवलेली बाबांची आनंदसाधना सामान्य साधकास अंतःस्फूर्ती देणारी व मार्गदर्शक आहे. पत्नी सौ. इंदिराबाई यांची प्रेमळ साथ त्यांना जन्मभर लाभली. बाबांप्रमाणेच त्यांनाही साध्या आणि सुसंस्कृत जीवनाची आवड होती. बाबांप्रमाणेच बुद्धीने तल्लख, सदाचरणी आणि लोकप्रिय. श्रीमहाराजांवर निष्ठा आणि शक्य तितका जप सांभाळून त्या ही संसारातील सर्व कर्तव्ये पार पाडीत. बाबांचे सुपुत्र श्रीपाद आणि त्यांच्या पत्नी शोभना यांचे बाबांच्या साधनेस व लोककार्यास महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

        श्रींच्या आज्ञेनुसार बाबांनी परमार्थावर प्रवचने केली. तसेच ५० पेक्षा जास्त पुस्तके लिहून परमार्थाची कल्पना स्पष्टपणे मांडली. त्यांपैकी काही अशी : अध्यात्मदर्शन, आनंदसाधना, ईश्वरदर्शन आणि ते अनुभवण्याची साक्षात साधना, ईश्वर स्वरूप आणि साक्षात्कार, उपनिषदांचा अभ्यास, चैतन्य गीता, चैतन्य सुधा–१-३, दासबोधामृत, द सेंट ऑफ गोंदवली–द लाइफ अँड सेइंग्ज ऑफ श्री ब्रह्मचैतन्य, नामसाधना व परमार्थप्रदीप, नामसाधनेमधील अध्यात्म आणि तुकारामाची नामसाधना, नाम समाधीचा अभ्यास व सहज समाधी, नामामृतपान–ज्ञानेश्र्वरीच्या श्रोत्यांना दिवाळीची भेट, परमार्थ प्रवचने–१-३, प्रवचन पारिजात, प्रेम योग, पत्राद्वारे सत्संग (प्रा. के. वि. बेलसरे यांची काही पत्रे), प्रा. के. वि. बेलसरे यांचे साधकांबरोबर झालेले अध्यात्म संवाद–१-४, बृहदारण्यक उपनिषद–तीन संवाद, भगवंताचे अनुसंधान साधनेचा प्राण, भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत–अनाहत नाद श्रवण, भावार्थ भागवत, मनाची शक्ती, महाराज मी शरण आहे–साधकांना श्री महाराजांचे आश्वासन, शरणागती, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्ममय, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची बोधवचने, श्री महाराजांचे विचार सौंदर्य, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (चित्रमाला), श्रीमद्भगवदगीता–मनाला उन्मन करणारी राजविद्या, श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचा आत्माराम अर्थव विवरण, श्री समर्थ रामदास स्वामी–१६.०३.१९९४ रोजी दासनवमीच्या दिवशी झालेल्या श्री. के.वि. बैलसरे यांच्या निरूपणातील भाग, श्री समर्थांचे चरित्र, संतांचे आत्मचरित्र, स्वरूपअनुसंधान अथवा अंतर्यात्रा, साधकांसाठी संतकथा, साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा, सार्थ श्रीमत् दासबोध, सार्थ मनाचे श्लोक, संतकुल चक्रवर्ती रसिकाग्रणी, सौदर्यमूर्ती श्रीज्ञानेश्वर महाराज–१९.१२.१९९२ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी झालेल्या श्री. के.वि. बेलसरे यांच्या निरुपणातील भाग, ज्ञानदेवांचा हरिपाठ, ज्ञानेश्वरी–खंड पहिला-नववा.

हे सुद्धा वाचा. "वाचाल तर वाचाल..!" खालील लिंक वर क्लिक करा.

=> ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांचे संपूर्ण चरित्र.  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!