“माझा मराठाची बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजासीं जिंके।
ऐशीं अक्षरें रसिकें। मेळवीन।”
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, – माऊली म्हणतात, ज्या माझ्या माय मराठी भाषेत सांगतो आहे ती भाषा अमृताशीही पैजा जिंकणारी आहे असे तुम्हाला वाटेल. अशी अक्षरे,अशी शब्दरचना मी करीन.
मराठी भाषेचा महिमा किती अगाध आहे; हे पाहण्यासाठी मागे वळून पाहावे लागते, मराठीत त्यासाठी एक सुंदर शब्द आहे, सिंहावलोकन. शिकार करताना मागे सरकायची किंवा मी काय केले हे पहायची सवय सिंहात दिसून येते. याला ‘सिंहावलोकन’ असे म्हणतात. मराठी भाषेचा ‘सिंहावलोकन’ केल्याशिवाय मराठी अमृताशीही पैजा जिंकणारी का आहे? हे तोपर्यंत लक्षात येत नाही.
प्रा. हरी नरके यांनी नव्याने एक सिद्धांत मांडला, त्याप्रमाणे मराठी ही इसवी सनाच्या पूर्वी पासून असलेली भाषा आहे. ते म्हणतात, माहाराष्ट्री उर्फ प्राचीन मऱ्हाठी ही सध्याच्या मराठीची आद्य जननी. अपभ्रंशी ( पुढे गुजराती भाषेला जन्म दिला ), शौरसेनी ( कालांतराने मागधी ) मागधी मधून बंगाली भाषेचा उगम झाला, नंतर पैशाची ही पुढे पाली व द्रविडी या भाषेस आकारास आल्या, महाराष्ट्री या सर्व प्राकृत भाषा समाजात मान्यता पावल्या म्हणजेच त्या भाषेतून ग्रंथनिर्मितीही झालेली आहे. अशा निरनिराळ्या प्राकृत भाषे पासूनच पुढे मराठी भाषेची निर्मिती झाली. मराठीला निर्माण व्हायला दीर्घ कालखंड गेला असणार.
या मराठी मातीच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, याच मातीत राबतात शेकडो हात. कृष्णा, कोयना, भीमा, पंचगंगा या नद्यांनी पावन झालेली ही भूमी…या मावळ-कोकण भूमीतील इंद्रायणी, घनसाळ, आंबेमोहोर तांदुळाची चव क्वचितच अन्य कुठल्या तांदुळाला असेल! इथे जन्मलेल्या शूरवीरांनी त्यांच्या पराक्रमाने आणि धाडसाने मृत्यूलाही आव्हान देऊन मृत्युंजय झाले आहेत. शंभूराजांचे सतत एक महिना त्यांच्या शरीराचे हाल केले तरीही त्यांनी मान झुकवली नाही! हा आहे मराठी बाणा! याच सुवर्ण सिंहासना पुढे मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, डच सर्वांनी माना झुकवल्या. मराठी मातीने दिलेला समतेचा संदेश तो अखंड भारतभर पसरतो आहे, गगनात घुमतोय स्वातंत्र्याचा रस…या मराठी मातीतून सरस्वतीचा जणू पालखी रथच वाहतो आहे. ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकोबाराय, संत एकनाथ अश्या महान संतांनी अमृताहूनी गोड ओव्या, रत्नजडित अभंग रचलेत. मराठीचे सौन्दर्य, शृंगार, अलंकार साऱ्यांनाच भुरळ घालते. अनेक प्रतिभावंत लेखक या मराठी मातीत जन्मलेत. शिवछत्रपतींनी मराठी शुद्धीकरणासाठी ‘राज्यव्यवहार कोश’ लिहला. याच मातीत सावरकरांची लेखणी तळपली, अण्णाभाऊ साठेंची गावरान डफावरील मराठी भाषा, कुसुमाग्रज्यांच्या कविता, पुलंची हास्यविनोदी कथा, वपुंच्या वैचारिक कथा, अन गो नी दांडेकरांची दुर्गभ्रमणगाथा इ. अनेक लेखकांनी संपन्न झालेली मराठी भाषा आहे. वासुदेव बळवंत फडके, राजगुरु यांच्या सारखे क्रांतिकारक; राजर्षि शाहू महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील, गोपाल गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, धोंडो केशव कर्वे, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले असे थोर समाज सुधारक या मातीत होऊन गेले.
“हीच अमुची पुण्यभूमी, कर्मभूमी आहे, इथल्या दगडाला सुद्धा इतिहास व भूगोल आहे, इथल्या दर्याखोऱ्यात वीरशीळा, वीरगळे , लेण्या, मंदिरे, शिल्प आहेत. अनादी, अनंत अश्या इतिहास, भूगोल अन पर्यावरणाने लाभलेला हा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे. याच मराठी मातीचा लळा भाळी लावावा..काहीजण म्हणतात मराठी आपण बोलतो पण ती का टिकवायची काय गरज आहे? काहीजण बोलतात इंग्रजी पुस्तके वाचतात मग ज्याची त्याची आवड काय वाचायचं ते? तर मग अश्याने तुम्हाला ‘मराठी भाषा’ मुळीच समजलेली नसते. त्याचा अगाध महिमा इंग्रजी पुस्तके वाचून नाही समजत. इंग्रजी जरूर वाचा, गरजेचं आहे; परंतु प्राधान्य माय मराठीला द्या. नाहीतर हल्ली मराठी मध्ये बोलताना आपण इंग्रजी शब्द वापरात असतातच…साधं उदाहरण घ्या ‘चहाचा कप’ आता इथे कप या शब्दाला मराठीत काय म्हणत असावेत? तर ‘कषायपेयपात्र’. असेच कितीतरी इंग्रजी शब्द आपण मराठी मध्ये बोलताना वापरत असताना दिसतो. आणि वर मराठी भाषा व महाराष्ट्र दिन ला ‘ही माय भूमी, ही जन्म भूमी ही’ असे अविर्भावात स्टेटस ठेवत असतो.
मराठी टिकवण्याची व त्याचा वारसा जपणारेही आहेत. त्यांचे विचार, लिखाण ,भाषेवर असलेली पकड पाहून, खरच अजून आपल्याला मराठी येत का ? हा ही प्रश्न पडतो. अश्या व्यक्तींच कौतुक करावे तितकं कमीच!