०२ फेब्रुवारी वासुदेव गोविंद आपटे यांची पुण्यतिथी.

0

निबंधकार, कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

वासुदेव गोविंद आपटे (जन्म : धरणगाव-खानदेश, १२ एप्रिल १८७१; - पुणे, २ फेब्रुवारी १९३०) हे मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबऱ्यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार होते. कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा सन १८९६मध्ये उत्तीर्ण झाल्यावर ते नागपूरच्या 'हिस्लॉप' कॉलेजात एक वर्ष फेलो होते. वा.गॊ. आपटे त्यानंतर पुण्यातही काही काळ शिक्षक होते. पुणे मुक्कामी त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली.

    'अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र' (१८९९) हे आपट्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. ते कोल्हापूरचे प्रोफेसर विजापूरकर यांच्या ग्रंथमालिकेतून प्रसिद्ध झाले. त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म ह्या विषयावरील 'बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास' हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी १९०५ मध्ये लिहिला व १९१४ साली तो प्रसिद्ध झाला. काही काळ त्यांनी अलाहाबाद येथील 'मॉडर्न रिव्ह्यू'त मराठी पुस्तकांच्या परीक्षणाचे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या 'ज्ञानप्रकाशा'च्या संपादनाचे काम केले. १९०६ साली त्यांनी 'आनंद' हे मुलांचे मासिक सुरू केले, ते अद्यापही (२०१८ साली) सुरू असावे. 'आनंद'चे संपादन व ग्रंथलेखन ह्यांच्या बरोबरीने तरुण पिढीला राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक गोष्टींचे सम्यक ज्ञान मिळावे या उद्देशाने त्यांनी विचारसाधना नावाचे वर्तमानपत्रही सुरू करून पाहिले, परंतु प्रकृति अस्वास्थ्यामुळे ते बंद करावे लागले (१९२०). त्यांच्या एकूण लेखनापैकी सुमारे ७५ टक्के लिखाण भाषांतरित, रूपांतरित व आधारित अशा स्वरूपाचे आहे. लेखन हा व्यवसाय त्यांनी आर्थिकदृष्ट्या यशस्वी करून दाखविला.

त्यांचे साहित्यः- मिसेस हेन्‍रीवुड, सॅम्युएल लव्हर, बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या दुर्गेशनंदिनी आदी कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद; 'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी' (१९१०),'लेखनकला आणि लेखनव्यवसाय' (१९२५), 'मराठी शब्दरत्‍नाकर' (१९२२), 'मराठी शब्दार्थचंद्रिका' (१९२२), आणि 'मराठी-बंगाली शिक्षक' (१९२५) ही भाषाभ्यास विषयक; 'जैनधर्म' (१९०४), 'टापटीपचा संसार' (१९१४), 'बालोद्यान पद्धतीचे गृहशिक्षण' (१९१८), 'सौंदर्य आणि ललितकला' (१९१९) इत्यादी विविध विषयांवरील चोवीस-पंचवीस पुस्तके व बालवाङ्‌मय विभागात छोटीछोटी तीस-बत्तीस पुस्तके त्यांनी लिहिली. सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरीवाङ्‌मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून वा. गो. आपट्यांनी चार खंडांत मराठीत आणले आहे. 'वाल्मीकीचा जय' (१९१०) ही त्यांची कादंबरीही बंगालीचे भाषांतर आहे. 'मूर्तिमंत देशाभिमान', 'माणिकबाग', आणि 'दुःखाअन्ती सुख' ही त्यांची पाश्चात्त्य कादंबऱ्यांची रूपांतरेही उत्कृष्ट आहेत. याशिवाय 'श्रीहरनाथ ठाकुर यांची पत्रावली', 'महाभारतातील सोप्या गोष्टी', 'नाट्यभारत', नाट्यरामायण, 'बालभारत', 'मनी व मोत्या', 'महाराष्ट्राचा बालबोध इतिहास', 'मुलांसाठी गोड गाणी', 'एक दिवसाच्या सुटीत' यांसारखी बालवाचकांच्या दृष्टीने रंजक असूनही उद्‌बोधक अशी पुस्तके त्यांनी लिहिली. पुराणे, इतिहास, विविधज्ञानसंग्रह, संतांची व थोरांची चरित्रे यांच्या आधारे वा. गो. आपटे यांनी बालांसाठी व कुमारांसाठी निर्माण केलेले साहित्य उल्लेखनीय आहे. 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चे ते पहिले घटनाकार, एका परीने जनक व संवर्धकही होते.

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!