२५ डिसेंबर ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन

0

 "परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, "तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर. प्रयत्‍नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे शुद्धा भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे 'नाम' हे होय."

 एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गांव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून ते सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून चाळीस मैलांवर आहे. त्यांच्या घराण्यांत विठ्ठलभक्ती व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचारसंपन्न व लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचें काम करीत. श्रीमहाराजांचे मूळ नांव गणेश रावजी घुगरदरे. स्मरणशक्ती, चलाख बुद्धि, पुढारीपणा, निर्भय वृत्ती, एकांतप्रियता, रामनामाची आवड ह्या गोष्टी श्रीमहाराजांमध्यें लहानपणापासूनच होत्या. ते नऊ वर्षांचे असतांना गुरूच्या शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळल्यावर त्यांनी त्यांना घरी परत आणले. त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षीं लग्न करण्यांत आले, परंतु त्यांचे प्रपंचात चित्त रमेना, आणि ते लवकरच गुरूशोधार्थ पुन्हा घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी भेतल्या. पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरूशोधार्थ हिंडले. शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगांव या गावी श्रीतुकारामचैतन्य यांचेकडे जाण्याचा सल्ला दिला.

        या सल्ल्यानुसार गोंदवलेकर हे तुकारामचैतन्यांकडे गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेनें गुरूसेवा केली, आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. तुकारामचैतन्यांनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवलें, आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.

        सद्‍गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें. त्यांचे शिष्य-प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकांत बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानांतही आहेत. त्यांची प्रथम पत्‍नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केले. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं रामाची देवळे उभारून उपासनेची केंद्रें निर्माण केली.

        गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरिबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळात मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्‍ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून लोकांमध्ये धर्मजागृती केली. नामस्मरण हें सर्वश्रेष्ठ साधन आहे असें त्यांनी कळकळीने व बुद्धीला पटेल अशा रीतीने सांगितले. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार घडले हें जरी खरे, तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले हा त्यांचा सर्वांत मोठा चमत्कार म्हणता येईल. लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मीलन कसे करावे हे शिकविण्यासाठीं त्यांनी आमरण खटाटोप केला, आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला.

हे सुद्धा वाचा. "वाचाल तर वाचाल..!" खालील लिंक वर क्लिक करा.

=> ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांचे संपूर्ण चरित्र.  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!